ओतूर : ओतूर येथील डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक विद्यालयात आमची शाळा आमचे उपक्रम या संकल्पनेतर्गत गणेशोत्सवाचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या चिमुकल्या हातांनी पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणपतीच्या मूर्ती साकारत प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा संदेश दिला.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका जयश्री पवार, पर्यवेक्षिका वसुधा आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक सचिन कुलकर्णी यांनी परंपरेनुसार १७ व्या कार्यशाळेचे आयोजन केले. यावेळी सचिन कुलकर्णी यांनी शाडूमातीपासून गणेशमूर्ती कशी साकारावी याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवले. मुख्याध्यापिका जयश्री पवार म्हणाल्या की, गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा उत्सव आहे. पण त्याचसोबत पर्यावरणाची जपणूक ही आपली जबाबदारी आहे. रासायनिक मूर्तीमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी शाडूमातीचा बाप्पा हा सर्वात उत्तम पर्याय आहे. विद्याथ्यर्थ्यांनी स्वतःच्या हातांनी साकारलेल्या या गणरायांतून त्यांची कला, सर्जनशीलता आणि पर्यावरणाबद्दलची जाणीव दिसून येते. ही संस्कारमूल्ये त्यांना आयुष्यभर उपयोगी ठरतील. या कार्यशाळेत जवळपास पन्नासहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. प्रत्येकाने स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती घडविताना बाप्पा मोरया च्या जयघोषात आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणपतीच्या आकर्षक मूर्तींनी उपस्थितांचे मन मोहून टाकले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कला शिक्षिका शालिनी साळुंके यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवृंदांनी सहकार्य केले.
